महाविकास आघाडीसारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर जनता नक्कीच स्वीकारेल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व दिले जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.शेतकरी आंदोलनाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची मोट बांधली जावी,असा आग्रह काँग्रेसचा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग हा केंद्रीय स्तरावर देखील व्हावा, अशी मागणीही केली जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर शरद पवार यांच्याकडे युपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी काँग्रेसकडून होत आहे.काँग्रेसने तसा प्रस्तावही दिला असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मंत्री नवाब मलिक यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आजच्या घडीला विरोधकांना एकजूट करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करत असल्याचे शरद पवारांनी आधीच सांगितले होते. या एकजुटीचा नेता कोण होईल हा प्रश्न आता समोर नाही.सर्वप्रथम सगळ्यांना एकजूट करणे हे काम आहे आणि ते पवार साहेब करत आहेत.आजच्या घडीला केंद्र सरकारविरोधात जे वातावरण आहे.त्याला कुठेतरी लोक कंटाळले आहेत. शेतकरी, गरीब, सामान्य व्यक्तीच्या मनात या सरकारविरोधात रोष आहे. जर सगळे विरोधक एकजूट झाले तर या देशात भाजपचे सत्ता परिवर्तन निश्चित आहे”, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखा प्रयोग देशपातळीवर होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, “नेतृत्वासंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा नाही. शरद पवार यांनीही तशी इच्छा दर्शवली नाही. याबाबत पुढे कोणता निर्णय होईल तो सगळे मिळून घेतील. पण, ज्या पद्धतीने शरद पवार यांनी महाराष्ट्रात जे अशक्य होते ते केले. शिवसेना, काँग्रेस एकत्र येईल असा कोणी विचारही केला नव्हता. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, विधान परिषदेच्या निकालांवरून हे लक्षात येते की, महाविकास आघाडीच्या प्रयोगाला महाराष्ट्राने स्वीकारले आहे. त्यामुळे देशात हा प्रयोग झाला तर निश्चित रूपाने जनता स्वीकारेल”, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. भाजपविरोधात चांगला पर्याय जनतेला दिला तर निश्चितच सत्ता परिवर्तन होईल, असा दवाही त्यांनी केला आहे.

Previous articleयुपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा,पंतप्रधानपदाचे उमेदवार ?
Next articleरावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपले पाहिजे,बच्चू कडू कडाडले