मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षणावर अद्याप तोडगा न निघाल्याने विरोधक ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. वारंवार केल्या जाणा-या या टीकेवर विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आधी होते त्याहून अधिक वकील या प्रकरणी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावरून आता जर कोणाला राजकारण करायचे असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले.आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून त्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकार गंभीर नसून योग्य भूमिका मांडत नसल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, योग्य भूमिका वकील मांडणार. तत्कालीन सरकारमध्ये जेवढे वकील ठेवले होते ते तसेच ठेवले आहेत. शिवाय त्यात अजून काही जणांचा समावेश करण्यात आला. अधिक चांगल्या पद्धतीने प्रकरण मांडता यावे यासाठीच हे केले. परंतु जर कोणाला राजकारण करायचे असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात ग्राह्य धरले तसेच ते सर्वोच्च न्यायालयात धरले जावे त्यासाठी आम्ही मोठ्या खंडपीठाकडे गेलो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेत झालेला दारुण पराभव विरोधकांना असह्य करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणता मुद्दा राहिलेला नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवरही निशाणा साधला. देशाच्या शेतक-यांचा प्रश्न महत्त्वाचा असून केंद्र सरकारने त्याला गांभीर्याने घेत नाही. भाजप नेते पाकिस्तान, चीनचे नाव घेऊन त्यांची बदनामी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच शतक-यांची भूमिका रास्त असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.