मुंबई नगरी टीम
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. असे असतानाच शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा आणखी एक नेता पीएमसी घोटाळ्याचा लाभार्थी असल्याचा दावा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट करत संबंधित शिवसेनेच्या नेत्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळा प्रकरणात आणखी एका शिवसेना नेत्याचे नाव असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. संबंधित नेता हा शिवसेनेचा माजी खासदार असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र हा नेता नेमका कोण? याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. पीएमसी घोटाळ्यात लाभार्थी ठरलेल्या या नेत्याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीआयएल, पीएमसी बँकेत घोटाळा करून मिळवलेल्या निधीचा मोठा वाटा संबंधित राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
याच प्रकरणी सोमवारी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी पार पडली. खरेतर ५ जानेवारी म्हणजेच आज मंगळवारी वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर राहणार होत्या. मात्र एक दिवस आधीच त्या ईडी कार्यालयात हजर झाल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा कायम आहे. याधीही आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीच्या कारवाईचा सामना करावा लागला होता. तर आता वर्षा राऊत व त्यांच्या पाठोपाठ आणखी एक शिवसेना नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.