मुंबई नगरी टीम
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅपचे कथित चॅट लीक झाले असून सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लीक झालेल्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी चॅनलचा टीआरपी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर या चॅटमध्ये संवेदनशील अशा बलाकोट हल्लाविषयी देखील चर्चा करण्यात आली आहे.हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वीच अर्णब यांच्याकडे याविषयी माहिती होती,असे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे देशभरात एकच खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीच्या व्हायरल चॅटच्या स्क्रिनशॉटचा फोटो जोडत ट्वीट केले आहे. “कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांच्या चॅटिंगवरुन दिसत आहे. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअरस्ट्राईक केला होता. मात्र हा हल्ला होण्याच्या तीन दिवसाआधीच अर्णबला याबाबत माहिती होती, असे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने प्रसिद्ध केले आहे. सोबत व्हायरल चॅट देखील जोडले आहेत. मात्र या चॅट संबंधित अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या सर्व गोष्टींवर आता प्रश्न उपस्थित केले जात असून मोदी सरकारवर देखील टीका केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील अर्णब गोस्वामीच्या या लीक झालेल्या चॅटवरून भाजपवर निशाणा साधला. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून TRP घोटाळ्यामध्ये भाजपा आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. AS कोण आहे याचे भाजपाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले होते. अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील हे कथित चॅट शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पार्थ दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून आरोपपत्रात देखील त्यांचे नाव आहे. यासह रिपब्लिक चॅनलचे प्रमुख हे आपला पंतप्रधान कार्यालय, माहिती जनसंपर्क मंत्रालय आणि AS यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे सदर चॅटमधून दिसत आहे. त्यामुळे ही AS नावाची व्यक्ती कोण आहे? हे भाजपने स्पष्ट करण्याची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.