मुंबई नगरी टीम
- शरद पवारांनी केले सार्वजनिक कार्यक्रम रद्द
- खासदार सुप्रिया सुळेंनी दौरे पुढे ढकलले
- मंत्री उदय सामंत यांनी नियोजित कार्यक्रम केले रद्द
मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णसंख्या वाढलेल्या जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच कठोर निर्बंधही लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावाचे संकट हे राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नुकताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राजकारण्यांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १ मार्चपर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.यापाठोपाठ इतर मंत्र्यांनीही आपले नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
“कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.”, अशी माहिती शरद पवार यांनी ट्विटद्वारे दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उद्या होणारा त्यांचा हिंगोली दौरा रद्द केला आहे. परिसंवाद यात्रेनिमित्त ते हिंगोली दौऱ्यावर येणार होते.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपला आजचा वरळी येथील कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्या, दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी ट्विट करत दिली. तसेच तुमच्या अडचणी या अर्ज स्वरूपात कार्यालयातील ड्रॉपबॉक्समध्ये द्यावेत. शिवाय काही अडचणी असल्यास माझ्या मंत्रालयाला संपर्क साधावा, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.
खासदार सुप्रिया सुळे
“मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझे २२ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मी पुणे येथील कार्यालयात भेटींसाठी उपलब्ध राहणार होते.परंतु या भेटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा दृढपणे मुकाबला करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ‘मी जबाबदार’ नागरीक आहे, त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी मी आवश्यक ती काळजी घेईन हा निश्चय प्रत्येकाने करावा ही विनंती”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.