मुंबई नगरी टीम
मुंबई । मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने शेतीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ आर्थिक व इतर मदत जाहीर करावी,अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरेकर यांनी पत्रात म्हटले की, २१ ते २३ मार्च या काळात नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मी २७ मार्चला नाशिक येथे जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षाही जाणून घेतल्या. नाशिक जिल्ह्यात लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे डाळिंब, द्राक्षे, टोमॅटो, मिरची, भाजीपाला, रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेला गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी आणि इतर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात बेदाणा प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो. सुकवत ठेवलेला व प्रक्रिया केलेल्या बेदाण्याचेही गारपिटीने व पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळे तेथील बेदाणा उत्पादक व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
दरेकर यांनी नाशिक दौऱ्यात नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा भेट दिली होती. त्याचा संदर्भ पत्रात देऊन नाशिक जिल्हात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा देखील त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.संकटाच्या काळात देखील शेतकऱ्यांची विद्युत कनेक्शन तोडली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. अद्याप पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. संकटात असलेल्या या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांना तातडीने सरकारी मदतीची आवश्यकता आहे, असे निदर्शनास आणून देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्यादेखील केल्या आहेत.
दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या
१) गारपीटग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करावेत.
२) शेतकऱ्यांना तात्कालिक आर्थिक व इतर मदत जाहीर करावी.
३) अवकाळग्रस्तांची वीज कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये, त्यास किमान ६ महिन्यांची स्थगिती द्यावी.
४) थकित कर्जामुळे आदिवासींच्या जमिनी लिलावात काढल्या जात आहेत. त्यास तातडीने स्थगिती द्यावी.
५) गेल्या तीन वर्षांपासून सतत नैसर्गिक आपत्तीचे संकट उत्तर महाराष्ट्र अनुभवत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याकडे वळायला लागले आहेत. या भागातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने शासकीय उपाययोजना आखाव्यात.
६) नाशिक जिल्ह्यातील करोना चाचण्यांची, लसीकरणांची संख्या वाढवावी व व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी.