मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ब्लड फॅार महाराष्ट्र हे अभियान हाती घेतले असून या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभर ७५ रक्तदान शिबिरे पार पडली त्यातून ४ हजार ३०० बॅगा रक्तसंकलन करण्यात आले आहे. तर येत्या महिन्याभरात या अभियानातून ४०० शिबीरे व २२ हजार बॅगा रक्त संकलन करणार असल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाच्या संकट काळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभर युवक राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबारे आयोजित करण्यात आली.या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या शिरुर कासार (जिल्हा बीड) येथुन करण्यात आली.आतापर्यंत ७५ रक्तदान शिबीरे पार पडली व त्या माध्यमातुन ४३०० बॅगा रक्त संकलन झाले आहे अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. ब्लड फॅार महाराष्ट्र या अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा – ९, नवी मुंबई – ७ ,अमरावती जिल्हा – १०, सोलापुर – ३, बीड – ३ , पुणे शहर – ४ , अकोला – ३ , नागपुर शहर -४, चंद्रपुर – ४, वाशीम – ४, सांगली शहर व ग्रामीण – ५ , नांदेड- २, लातुर – २ , पनवेल शहर – २, औरंगाबाद- १, उस्मानाबाद – २, यवतमाळ – ३, कोल्हापुर ग्रामीण – २,धुळे – १, नंदुरबार – १, गोंदिया – १ , गडचिरोली – २, आदी ठिकाणी शिबीर पार पडली.
येत्या महिनाभरात या अभियानातून ४०० शिबीरे व २२ हजार बॅगा रक्त संकलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे असे सांगतानाच याअगोदर मार्च २०२० मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘ मी रक्तदान करणार , माझ्या एका भावाला जीवनदान देणार ‘ हे अभियान राबवून ४ महिन्यात ३९६ रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन १५ हजार २०० बॅगा रक्त संकलन केले होते अशी माहितीही मेहबूब शेख यांनी दिली.