नवाब मलिक पुरावे द्या,अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई : रेमडिसिव्हर व ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्रास करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली आहे,त्यामुळे ठाकरे सरकारने घाणेरडे राजकारण थांबवून महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी,अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.तसेच नवाब मलिक यांनी रेमेडिसिव्हरच्या उत्पादनाबाबत केलेल्या आरोपांवर दरेकर म्हणाले की, मलिक यांनी याबाबत पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राने बंदी घातली असल्याचा आरोप केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावत प्रतित्युत्तर दिले आहे.ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर औषधाच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे.ठाकरे सरकारने ‘जनाची नाही तर मनाची’ बाळगून या विषयावर चालू केलेले निर्लज्ज राजकारण थांबवावे, अशी घणाघाती टीकाही दरेकर यांनी केली आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रसायन,खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत ऑक्सिजन,रेमेडिसिव्हर च्या पुरवठ्याबाबत वस्तुस्थिती मांडली आहे.केंद्राने महाराष्ट्राला ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा केल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. देशात क्षमतेच्या ११० टक्के एवढे ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत केंद्रावर आरोप केल्यानेच गोयल आणि मांडवीय यांना ट्विटद्वारे ही माहिती द्यावी लागली आहे. ठाकरे सरकारने जीएसटी भरपाई आणि लसीकरणाबाबत असेच खोटे आरोप करत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाबाबत आकडेवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे सरकारला मुकाटपणे गप्प राहावे लागले.एखादी जबाबदारी पेलवली नाही की सरळ केंद्रावर आरोप करायचे ही ठाकरे सरकारची सवयच आहे.ठाकरे सरकारने आता तरी केंद्रावर खापर फोडण्याचे घाणेरडे राजकारण थांबवावे असेही दरेकर यांनी म्हटले आहे.नवाब मलिक यांनी रेमेडिसिव्हरच्या उत्पादनाबाबत केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय रसायन,खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत मलिक यांना त्या १६ कंपन्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. मलिक यांनी हे आव्हान स्वीकारावे, म्हणजे जनतेला वस्तुस्थिती कळेल.आपण केलेल्या आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णालयांची अव्यवस्था मात्र समोर येत आहे. ऑक्सीजन आणि बेड्स उपलब्ध नाहीत. पण यावर उपायययोजना आणि भाष्य राज्यातील सरकार करताना दिसत नाही. रेमडेसिवीरसाठी केंद्र सरकार व भाजपा देश पातळीवर संवेदनशिलतेने प्रयत्न करीत आहे,परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र घरात बसून फोन किंवा फॅक्सवरून काम करताना दिसत आहे. अशी कामे घरात बसून होत नाहीत तर संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या बैठका घेऊन करावे लागते.मात्र, प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर टीका करून, केंद्राला जबाबदार ठरवून प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे सरकार करत असल्याचा टोलाही दरेकर यांनी नवाब मलिक यांना लगावला.राज्य सरकारला आरोग्य व्यवस्था सुरळीत करता येत नाही, महामारीच्या काळात रुग्णांना आरोग्य सेवा देता आल्या नाहीत, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सरकारचे मंत्री करीत आहेत. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कृती करावी, अशा शब्दात दरेकर यांनी मलिक यांचा समाचार घेतला.

Previous articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा धडाका;४ ३०० बॅगा रक्त संकलन,२२ हजार बॅगा संकलनाचा निर्धार
Next articleअल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप