मुंबई नगरी टीम
नागपूर । राज्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करीत लॉकडाऊन लागू केला आहे.त्याची मुदत येत्या १ मे रोजी संपुष्टात येत आहे.मुंबई,पुणे आदी शहरातील रूग्ण संख्या अटोक्यात येत असली तरी राज्यातील काही भागातील परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात पुढील काही काळासाठी पुन्हा लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात कोरोनाने कहर केल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत हे कडक निर्बंध लागू करीत संपूर्ण संचारबंदी जाहीर केली.या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांवर निर्बंध लागू केले आहेत.राज्य सरकारने लागू केलेल्या या संचारबंदीचा चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे..मुंबई,पुणे या मोठी लोक संख्या असलेल्या शहरातील रूग्ण संख्या कमी झाली असल्याचे दिसत असले तरी राज्यातील ग्रामिण भागातील परिस्थिती गंभीर असल्याने येत्या १ मे रोजी लॉकडाऊन संपुष्टात येत असला तरी पुढील काही काळासाठी राज्यातील लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.राज्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली असली तरी,राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल,अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.