मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस असून,संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख या कार्यकर्त्यांने चक्क एका दैनिकांत जाहिरात देवून आपल्याकडून दोन वर्षापूर्वी झालेल्या चूकीबद्दल आशिर्वादरूपी माफीचं रिटर्न गिफ्ट देण्याची विनवणी केली असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असून,दोन वर्षापूर्वी झालेल्या चूकीबद्दल माफ करा,अशा आशयाची जाहिरात राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दैनिकात देवून माफ करण्याची विनवणी केली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याच्या स्थितीत असतानाच अजित पवार यांनी बंड करून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला होता.या पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे नेते,कार्यकर्ते आक्रमक झाले होते.त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विरोधात वाय. बी. चव्हाण सेंटर येथे घोषणाबाजी केली होती.त्यावेळी नितीन देशमुख हा कार्यकर्ता या घोषणाबाजीत आघाडीवर होता.या घोषणाबाजीला विविध वाहिन्यांनी ठळक प्रसिद्धी दिली होती.नितीन देशमुख यांच्या या घोषणाबाजीमुळे अजित पवार प्रचंड नाराज होते.त्या दिवसापासून पवार यांनी या पदाधिका-याशी बोलणे सोडले होते.अजित पवार तेव्हापासून नितीन देशमुखांशी बोलले नाहीत.आज अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी अजित पवार यांचा जाहिरातीच्या माध्यमातून मनधरणीचा प्रयत्न केला आहे.
“दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा
तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या
दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे
पण दादा, आता सहन होत नाही
संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी
आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन
आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या..”
एवढीच माफक अपेक्षाआपला कृपाभिलाषी नितीन हिंदुराव देशमुख
नितीन हिंदुराव देशमुख यांनी अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.आजही ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे.