मुंबई नगरी टीम
मुंबई । गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाचा इतिहास तपासावा, संघाचं काम नेहमीच राष्ट्रहितासाठी व एकात्मतेचे असतं.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापलीकडे जाऊन देशभक्तीने काम करत आहे.त्यामुळे जावेद अख्तर यांनी कोणत्याही प्रकारे संघाच्या कार्याचा अभ्यास न करता अशा प्रकारचं वक्तव्य केलं असल्याचे सिद्ध होत आहे. त्यांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून जो संघ राष्ट्रभक्तीने प्रेरित आहे त्यांच्याविषयी असं बोलणं म्हणजे राष्ट्रहिताच्या विचाराच्या विरोधात त्यांची मुक्ताफळे असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांसोबत केली आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे म्हणत आरएसएसला समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले असून त्याविषयी बोलताना दरेकर म्हणाले, जावेद अख्तर यांनी सर्वप्रथम संघाचा इतिहास तपासावा. संघाने देशाच्या एकात्मतेसाठी व राष्ट्रहितासाठी भूमिका घेतली. समाजातील उपेक्षित घटकासाठी काम केलं. सामाजिक बांधीलकीतून अनेक घटक संघाचे काम करत असतात. वनवासी कल्याण आश्रम संघ असो किंवा अनेक घटक असो, त्यामुळे संघ राजकीय प्रेरित कधीच नव्हता आणि कधीच नसतो आणि अशा वेळेला संघाची वज्रमूठ या देशांमध्ये आहे. परंतु त्याचा पोटशूळ काही लोकांच्या मनामध्ये आहे, तो अधून मधून अशा व्यक्तव्यातून बाहेर येत असल्याचा टोलाही दरेकर जावेद अख्तर यांना लगावला