तीन पक्षाचं सरकार असलं तरी हे ‘ठाकरे’ सरकार आहे :राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई नगरी टीम

पुणे । राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे तर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तिन्ही पक्षात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असले तरी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केले जाणा-या वक्तव्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय अशी अनेकदा परिस्थिती उद्भवली गेली असतानाच पुणे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या दौ-यावर असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी शिवसेना सगळ्यांच्या वर आहे,’ असे राऊत म्हणाले आहेत.पुणे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी,मनसे,भाजप यांनी जोरदार तयारीला सुरूवात केली असतानाच,शिवसेनेने सचिन अहिर आणि आदित्य शिरोडकर यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवली आहे. खेड-शिरूर मध्ये झालेल्या मेळाव्यात राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचे सरकार समजले जाते. त्यामुळे हे ठाकरे सरकार आहे. दुसऱ्या कोणात्याच मंत्र्याच्या नावाने सरकार ओळखले जात नाही,महाविकास आघाडीतील पक्ष आणि नेते आपलेच आहेत. अजित पवार,शरद पवार आपलेच आहेत.पवार हे देशाचे नेते आहेत आणि त्यांनी देशाचे नेतृत्व केले पाहिजे असे आम्ही म्हणत असतो. सरकारमध्ये अनेक जण असले तरी शिवसेना सगळ्यांच्या वर आहे.’शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते.काँग्रेसला,राष्ट्रवादीला लागते आणि भाजपलाही लागते. ह्यालाच पावर म्हणतात,असे राऊत म्हणाले.राऊत यांनी आपल्या तुफानी भाषणातून एक प्रकारे राजकारणातील सेनेते महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

Previous article‘करेक्ट’ कार्यक्रम करू म्हणणा-या शेट्टींच्या इशा-याला शरद पवारांनी दिले उत्तर
Next articleRSS ची तुलना ‘तालिबान्यांशी’ करणा-या जावेद अख्तरांवर दरेकर भडकले