अजित पवारांना कोरोनाची लक्षणे,केली कोरोनाची चाचणी;बारामतीच्या कार्यक्रमाला गैरहजर

मुंबई नगरी टीम

बारामती । दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्यानिमित्ताने बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.मात्र माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात झालेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगतले.

कोरोनामुळे गेल्या वर्षी बारामतीत होणारा पवार कुटुंबियांना दिवाळी स्नेहमेळावा कार्यक्रम होवू शकला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पवार कुटुंबियांच्यावतीने दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी गोविंदबाग येथे होणारा हा कार्यक्रम यंदा माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात पार पडला.त्यावेळी पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील कानाकोप-यांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी पवार कुटुंबिय हजर होते.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर असल्याने सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का बसला त्यामुळे अनेक चर्चां सुरू झाल्या.मात्र या बाबत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला.

अजित पवार यांचे दोन वाहन चालक आणि तीन कर्मचारी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.त्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.त्यांनाही कोरोनाची शक्यता वर्तवली आहे.त्यात या कार्यक्रमानिमित्त राज्यातील हजारो कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याने उगीच धोका नको म्हणून अजित पवार आजच्या कार्यक्रमाला आले नाहीत,असे शरद पवार यांनी सांगितले.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.केंद्राने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत.आता राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, राज्य सरकारने दिलासा देऊ असे म्हटले आहे.मात्र केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणे लवकर द्यावे त्यामुळे दिलासा देण्याचा निर्णय घेतला जावू शकतो.पवार यांनी यावेळी एसटीच्या संपावरही भाष्य केले.दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही.काहींनी टोकाची भूमिका घेतली असल्याने हे घडत आहे.असे सांगतानाच संस्थेच्या आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य ठरणार नाही.न्यायालयाने हा संप कायदेशीर नसल्याचे म्हटले आहे.त्यामुळे न्यायालयाचा आदर ठेवत हा विषय संपवावा असे आवाहन पवार यांनी केले.

Previous articleनवाब मलिक करणार रविवारी नवा धमाका ! “होटल द ललित मे छुपे है कई राज”
Next articleचिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले होते ? नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट