चिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले होते ? नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या महिन्यात चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होता.यावेळी राणे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली होती.चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे यांच्या कानाजवळ जाऊन नेमकी कोणती खोचक टिप्पणी केली होती.याचा गौप्यस्फोट केंद्रीय सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी एक दिवस अगोदर केंद्रीय सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भांडाफोड करणार असल्याचा इशारा मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता.त्यानंतर दुस-या दिवशी चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात आक्रमक होत राणे यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.”माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण, या कार्यक्रमासाठी राजकारण करु नये असं वाटत होतं,जाऊन शुभेच्छा द्याव्या,सिंधुर्गातील चिपी विमानतळावरुन उडणारं विमान पाहण्यासाठी मी आलो होतो,आलो,मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेबही भेटलो, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकला”, असो..असे आपल्या भाषणात राणे म्हणाले होते.तो शब्द कोणता होता याचा उलघडा आज राणे यांनी केला आहे.

कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर भांडाफोड करणार,असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यात कानापाशी येवून तुम्ही भांडी आणलीत का, असा खोचक सवाल विचारला.हे ऐकल्यानंतर मी भांडाफोड करायचाच,असे ठरवले.त्यानंतर मी व्यासपीठावर जाऊन बोललो. माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरे कार्यक्रम संपेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत.आमच्या दोघांच्या आसनांमधील अंतरही वाढवण्यात आले,असे राणे यांनी आज सांगितले.यावेळी राणे यांनी पोटनिवडणूकीच्या निकालावरही भाष्य करीत शिवसेनेवर निशामा साधला.कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिल्लीत धडका मारायची भाषा करत आहेत. परंतु डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात.तेव्हा राऊत यांनी बोंबलत बसू नये, असा टोलाही राणे यांनी लगावला.

राज्यातील ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असे वाटत नाही,असे सांगतानाच,ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी पडेल अशी भविष्यवाणी राणे यांनी वर्तवली.या सरकारला पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही.हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.आजच्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीला जात नाहीत. मंत्रालयात जात नाही. कोणतं काम करायचे तेही माहीत नाही.मात्र नको त्या विषयावर बोलतात. हे काय मुख्यमंत्री आहेत का ? माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचेच नाव घ्यावे लागेल, असा टोलाही राणे यांनी लगावला.

 

Previous articleअजित पवारांना कोरोनाची लक्षणे,केली कोरोनाची चाचणी;बारामतीच्या कार्यक्रमाला गैरहजर
Next articleअहमदनगर दुर्घटना : हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई