मुंबई नगरी टीम
सांगली । राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना आम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही घाबरलो असतो तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकला नसता. त्यांना वाटते की त्यांना आम्ही घाबरतो. पण त्यांना आम्ही भीकही घालत नाही व घाबरत नाही. त्यांनी काय बाहेर काढायचे ते काढावे. असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असा जबरदस्त पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर आज केला.
नवाब मलिक यांनी प्रविण दरेकर यांच्यावर टीका करताना दरेकर घाबरलेले आहेत. त्यांचे गौडबंगाल मी बाहेर काढणार आहे, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, आम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही कुठच्या गाड्यांतून फिरतो, काय करतो, त्याच्यासाठी नवाब मलिक यांच्या घरातून तर पैसे आणत नाही. कोणत्याही बँकेचा पैसा कोणाला व्यक्तिगत वापरता येत नाही. बँकेची बदनामी तुम्ही करता हे योग्य नाही. एक वेळ आमची बदनामी करा, आमच्यावर टीका करा. आम्ही ती सहन करू. पण एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते तेव्हा तेथील खातेधारकांवर परिणाम होतो व एकंदर संस्थेच्या विश्वासाहर्तेवर परिणाम होतो असेही दरेकर यांनी स्ष्ट केले.