मुंबई नगरी टीम
मुंबई । नाव राष्ट्रवादी काँग्रेस असले तरी तो पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, अशी टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे.शरद पवार यांच्यावर बोलणा-या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवार त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे.त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावे लागते. पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही.शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात.त्याच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय नाही,त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही.नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर सोडले होते.
फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.शरद पवार मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत.कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवार यांच्यावर भाष्य करत आहेत.याअगोदरही पवार यांच्यावर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.शरद पवार यांच्यावर बोलणा-या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवार त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा टोला मलिक यांनी लगावला आहे.