कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीत ? फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा देत विरोधकांनी ही मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लावून धरली असताना आज मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आझाद मैदानावर भव्य धडक मोर्चा काढला होता.त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आझाद मैदानात धडक मोर्चा काढला होता.त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही ? असा सवाल करतानाच तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय मलिकांचा राजीनामा का घेत नाहीत ? असा त्यांनी केला.मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले त्यावरूनही फडणवीस यांनी निशाणा साधला.पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही,मुख्यमंत्री म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी तुमचे आणि आमचे जमत नसेल,ते सोडून द्या मात्र तुम्हाला एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना उत्तर द्यायचे आहे.तेव्हा तुम्हाला विचारले जाईल,अशी व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात कशी ? तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल असा सवालही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला.तेव्हा आम्ही बाळासाहेबांना सांगू, की बाळासाहेब यासाठी आम्ही संघर्ष केला पण आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते,की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत.कारण मलिकांचा राजीनामा घेतला, तर माझे सरकार जाईल, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगून,हा संघर्ष पाकिस्तानधार्जिण्या,देशद्रोह्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही.आम्ही रोज राजीनामे मागत नाहीत. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे, असे फडणवीस म्हणाले.मुंबई बॉम्बस्फोटातील विध्वंस मुंबईकर विसरलेले नाहीत.या बॉम्बस्फोटमालिकेतील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल.भाजपाचा आजचा मोर्चा हा मुंबईकरांचा आक्रोश असून या मोर्चाच्या माध्यमातून नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेला लाथ मारून बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरी बाणा गिरवावा व मंत्री मलिक यांचा राजीनामा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Previous articleराज्यपालांनी आतातरी अध्यक्ष निवडणूक आणि १२ आमदारांच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा
Next articleदाऊदच्या दबावामुळे नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही;चंद्रकांतदादांचा गौप्यस्फोट