मशिदीसमोर भोंगे लावल्याने देशातील बिघडलेले वातावरण चांगले होईल

मुंबई नगरी टीम

मुंबई । भोंगे लावून देशाचे वातावरण शांत होते का ? उलट प्रदूषित होते.लोकांना त्रास होतो. प्रत्येकाने आपला धर्म,आपली पूजाअर्चा चार भिंतीत करावी.आपल्या पूजाअर्चेमुळे,आपल्या आरडाओरडीमुळे सर्वसामान्य माणसाला त्रास कशासाठी.पण उलट मशिदीसमोर भोंगे लावल्याने देशातील बिघडलेले वातावरण चांगले होणार आहे, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असतानाच आता महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही मशिदीसमोर भोंगे लावले जात आहेत,याने वातावरण शांत होणार आहे की गढूळ होणार आहे ? यावर प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यामुळे ज्या ठिकाणी भोंग्याच्या माध्यमातून वातावरण खराब आणि गढूळ होते, ते शांत करण्याचा यानिमित्ताने प्रयत्न होणार आहे. राज ठाकरे उद्या पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त आरती करणार आहेत. भाजपचा राम आणि मनसेचा हनुमान असे समीकरण आहे का? यावर दरेकर म्हणाले की, आपल्या दैवतांना पक्षात विभागणे योग्य नाही. राम किंवा हनुमान ही आपली दैवते आहेत. त्यामुळे रामाच्या प्रति भक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानाकडे पहिले जाते. भक्तीचे, निष्ठेचे, शक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांची विभागणी करणे योग्य नाही. हिंदूंची दोन्ही दैवते आहेत. जो जो पक्ष किंवा या देशातील व्यक्ति हिंदुत्वाच्या, हिंदू दैवताच्या बाजूने येईल ते आम्ही सर्व एक असू, असे दरेकर यांनी सांगितले.

संजय राऊत यांची भूमिका तकलादू व दुटप्पी
संजय राऊत भ्रमिष्ट आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची मजल न्यायालयावर टीका करण्यापर्यंत गेली आहे. याचा अर्थ त्यांनी बेतालपणे वक्तव्याच्या सर्व सीमा तोडून टाकल्या आहेत. न्यायालयाचा अवमान करण्याचे काम ते करतायत. तकलादू आणि दुटप्पी भूमिका वैफल्याच्या भावनेतून संजय राऊत घेताना वारंवार दिसतायत, अशी टीकाही त्यांनी केली.संजय राऊत यांनी न्याय व्यवस्था काही ठराविक लोकांना दिलासा देत आहे, असे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटची आशा म्हणून न्याय व्यवस्था निर्माण केली.

तुम्ही चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करत असाल, त्या ठिकाणी सरकारच्या दबावाखाली पोलिस वागत असतील. जर न्यायव्यवस्था दिलासा देणार असेल, तर आपण आत्मपरीक्षण करून पाहा. आपणच काही चुकीचे करतोय याचे आत्मपरीक्षण करा आणि भाजपला जबरदस्तीने अडकवण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या लोकांचे गुन्हे होतायत याचे पुरावे आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्था दिलासा देत नाही. न्याय व्यवस्था डोळसपणे न्याय देत असते. तुम्ही चुकीचे कराल, तर न्याय व्यवस्था चुकीच्या गोष्टींचे समर्थन कसे करेल? न्याय व्यवस्था सच्चाईच्या मागे असते. भाजपच काय कोणताही पक्ष न्याय व्यवस्थेवर दबाव आणू शकत नाही. संजय राऊत यांनी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सरकार बनवण्याच्या वेळेला भाजपच्या विरोधात जो निर्णय दिला तो भाजपच्या विरोधात होता. तेव्हा गळा फाडून सांगत होते की, न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला. न्याय व्यवस्था श्रेष्ठ आहे, तेव्हा आम्ही न्यायालयाचे म्हणणे मानले. आम्ही आरडाओरड नाही केली, न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला म्हणून. केंद्रात आमचे सरकार होते. म्हणजे आपल्या बाजूने झाले, की न्यायव्यवस्था चांगली आणि विरोधात झाले की न्यायव्यवस्थेवर दबाव असे म्हणायचे, असे दरेकर यांनी सांगितले.

Previous articleकेंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रावर लोडशेडींगचे संकट ;ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा आरोप
Next articleकोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत करूणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली !