मुंबई नगरी टीम
बीड । राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘कन्यादान विधी’,वैदिक मंत्र,समाज याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे,मात्र जात -पात -धर्म याबाबतीत भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही,परंतु माध्यमांमधून अमोल मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे आहे.ही आमच्या पक्षाची भूमिका नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला.तरीही यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दोन पिढ्या पासून या समाजातील माझे असंख्य सहकारी सावलीसारखे आपल्या सोबत आहेत, आणि ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. याची परिपुर्ण जाणिव आपल्याला आहे. माझ्या राजकीय वाटचालीत आमच्या परळीचे ब्राम्हण समाजातील प्रथम नगराध्यक्ष म्हणून माझे सहकारी बाजीराव धर्माधिकारी यांना संधी दिली. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू आपल्या मनात येऊ शकत नाही. अमोल मिटकरी यांना आपण बोललो असून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याने योग्यवेळी त्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही धनंजय मुंडे यांनी या विषयावर बोलताना म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी व्यक्तीगत भाष्य केलेले आहे.याविषयी स्पष्टिकरण देण्याची गरज असल्याचे आपण त्यांना सांगितले आहे.कोणत्याही समाजाच्या भावना दुखविण्याचा विचार आपल्या मनात कधी येतो ना यापुर्वी असे काही घडलेले नाही.तरीही याबाबतीत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो.परंतु सर्वांना सोबत घेत जातीपाती विरहीत वाटचाल सुरू आहे सुरु राहील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.