मुंबई नगरी टीम
मुंबई । महाविकास आघाडीतील नेत्यांना सळोकीपळो करून सोडणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीनंतर त्यांनी ट्विटवर फोटो शेअर करीत वादग्रस्त मजकूर टाकल्याने सोमय्या वादात सापडले आहेत.त्यांच्या या वादग्रस्त ट्विटचा तीव्र निषेध करीत याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी दिली.सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांना ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे यांना माफिया मुख्यमंत्री असे म्हटले असल्याने शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे.
मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला.शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले.तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहचल्यानंतर सर्वांच्या भोवया उंचावल्या होत्या.मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना सोमय्या यांच्यासोबत त्यांचे पुत्र नील सोमय्या देखिल उपस्थित होते.या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करीत मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.माफिया मुख्यमंत्र्यांना हाटविल्याबदल अभिनंदन केले. असे वादग्रस्त मजकूर शेअर केल्याने अनेक चर्चांना उधाण आले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सोमय्या यांनी केलेल्या विधानाचा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख हे मोठे नेते आहेत.मुंबईत आल्यावर शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार यांची संयुक्त बैठक झाली त्या बैठकीत शिवसेनेच्या मोठ्या व्यक्तींबद्दल वाईट बोलायचे नाही असे ठरले होते.सोमय्यानी केलेल्या या वक्तव्याचा निषेध करीत याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून नाराजी व्यक्त करणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.तर माजी पोलीस आयुक्त संजय पांडे,संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायद्याचा दुरूपयोग करीत माफियागिरी केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला असल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये यामुळे वादाची ठिणगी पडली आहे.