मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.तर १५ दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही,संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्यात सत्तांतराच्या नाट्यानंतर भाजपाप्रणित सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.उमुख्यमंत्री आहेत पण त्यांच्याकडे कोणतेही खाते नाही.मुख्यमंत्री कार्यालयातही अजून प्रशासन व्यवस्था नाही. मागील १५ दिवसात शिंदे-फडणवीस या दोघांचेच सरकार असून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करून जुन्या भाजपा सरकारचेच निर्णय पुढे रेटण्याचा सपाटा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच या सरकारने राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याऐवजी मुंबईकरांच्या जीवावर बेतणाऱ्या आरे कारशेडचा निर्णय घेतला.सरपंच, नगराध्यक्ष यांची थेट निवडीचा निर्णय घेतला आहे. मविआ सरकारने रद्द कलेले निर्णय पुन्हा लागू करण्याचे काम सुरु आहे.शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशी टीका लोंढे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट असून वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री पाटील यांनी केली.संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला आहे.