उद्धव ठाकरेंची खेळी मंत्री संजय राठोड चिंतेत; बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज शिवसेनेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांना शह देण्यासाठी शिवसेनेने बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांना पक्षात प्रवेश देत मंत्री संजय राठोड यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेत शिवबंधन बांधले.दसरा झाल्यावर राज्यभरात दौरा करणार असल्याचे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिग्रस विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघात प्राबल्य असलेले बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शिवबंधन बांधले.महंत सुनिल महाराज यांना शिवसेनेत प्रवेश देवून शिवसेनेने मंत्री राठोड यांना शह देत त्यांच्या पुढे आव्हान उभे केले आहे.आज पोहरादेवीची यात्रा आहे तो मुहुर्त साधून मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून,बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास घडविणे फक्त शिवसेनेला शक्य आहे हे लक्षात आल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे महंत सुनिल महाराज यांनी यावेळी सांगितले.शिवबंधन बांधल्यानंतर महंत सुनिल महाराज व त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना पोहरादेवी येथे येण्याचे आमंत्रण दिले.महंत यांना शिवसेनेत प्रवेश देवून मंत्री संजय राठोड यांना शह दिला आहे अशी चर्चा असतानाच,’शह वगैरै गोष्टींवर माझा विश्वास नाही.मला पुढे जायचे आहे.जे सोबत येतील ते माझे आहेत व लढाईच्यावेळी जे सोबत येतात त्यांचे महत्त्व अधिक असते. त्याच्यामुळे एवढा मोठा समाज सोबत आल्यावर एखाद्या व्यक्तीला शह देणे ही फारच शुल्लक गोष्ट आहे,असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना लगावला.

Previous articleएकनाथ शिंदे शिवसेनेचे १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते ! चंद्रकांत खैरेंचा दावा
Next articleशिंदे गटाच्या युवासेना कार्यकारिणीत आमदारांच्या पोरांचा भरणा; वाचा कुणाला मिळाली संधी ?