शिंदे गटाच्या युवासेना कार्यकारिणीत आमदारांच्या पोरांचा भरणा; वाचा कुणाला मिळाली संधी ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाने आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखवण्यासाठी युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांना हटवून सरचिटणीसपदी किरण साळी यांची नेमणूक केली होती.त्यांनतर आज युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहेत.मात्र या कार्यकारिणीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा शिंदे गटाच्या आमदारांच्या मुलांचाच जास्त भरणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे.मात्र या कार्यकारिणीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा शिंदे गटाच्या मुलांचाच भरणा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर,आमदार सदा सरवणकर,आमदार प्रकाश सुर्वे,आमदार भरत गोगावले यांच्या मुलांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.तसेच माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यकारिणीत असलेल्या पदाधिका-यांनाही या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार भुसे यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे.रायगडचे आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर कोकणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.शिंदे गटाची आज जाहीर करण्यात कार्यकारिणी पुढील प्रमाणे- उत्तर महाराष्ट्र : अविष्कार भुसे,मराठवाडा :अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील,कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग -विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे, पश्चिम महाराष्ट्र :किरण साळी, सचिन बांगर कल्याण भिवंडी :दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक, ठाणे, नवी मुंबई व पालघर :नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे,मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे -विदर्भ :ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील.

Previous articleउद्धव ठाकरेंची खेळी मंत्री संजय राठोड चिंतेत; बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज शिवसेनेत
Next articleमंत्र्यांना अंधारात ठेवणे सहसचिवाला पडले महागात ! मंत्रालयातील सहसचिवावर कारवाई