मुंबई नगरी टीम
मुंबई । येत्या २२ तारखेपासून दिवाळी सण सुरू होत असून या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.
येत्या २२ ऑक्टोबरपासून दिवाळी सण सुरू होत असल्याने राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी सुकर व्हावे म्हणून ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि निवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.त्यानुसार दिवाळी सणासाठी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.एरव्ही ऑक्टोबरचा पगार नोव्हेंबरमध्ये होत असतो.मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होणार आहे.वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.