मुंबई नगरी टीम
मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांबाबत अपमानकारक वक्तव्य काही राजकीय व्यक्ती,सरकारमधिल मंत्री आदी मात्तबर लोक करत असून त्यामुळे समाजातील वातावरण बिघडविन्याचे काम होत आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे अपमानकारक वक्तव्य करून या महापुरुषांचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर सरकारने चुकीचे लावलेले ३०७ व १२० ब कलम तात्काळ रद्द करावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेने केली आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र दिवंगत भय्यासाहेब आंबेडकर यांची ११० वी जयंती दादर पूर्व येथिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष उत्तम मगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तीव्र निषेध करण्यात आला.संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष डॉ. हरिष रावलिया हे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. त्यांनी यशवंतराव आंबेडकर यांच्या जीवनातील काही घटना सांगून देशात भारतीय संविधान बदलण्याचा डाव चालू असून त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असे सांगितले. विश्वस्त कॅप्टन प्रविण निखाडे यांनी भय्यासाहेब यांनी केलेल्या धम्म कार्यावर प्रकाश टाकून सर्वांनी धम्म कार्यासाठी वाहून घेतले पाहिजे असे सांगितले.राष्ट्रीय उपाध्यक्षएस के भंडारे यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध झाल्याने कधीही राखीव जागेचा व दलित मित्र पुरस्काराचा फायदा घेतला नाही, देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचेव समतेचे विरोधक संविधान बदलणार असल्याने संविधान वाचविण्यासाठी वेळ पडली तर भारतीय बौद्ध महासभेला रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल असे सांगितले. तसेच महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करून समता सैनिक दलाचा मनोज गडबडे याच्यावर लावलेले ३०७,१२० कलम रद्द करावे अशी मागणी केली. भीमराव आंबेडकर संस्थेचे विश्वस्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष,राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल यांनी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्याबाबत पुण्याचे वकिल असीम सरोदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. जगदिश गवई आणि सुषमाताई पवार,राष्ट्रीय सचि व ऍड एस एस वानखडे, केंद्रीय सदस्य एम डी सरोदे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, त्यागावर आणि त्यांच्या कार्यावर भाषणे केली.