मुंबई नगरी टीम
नागपूर । राज्यातील शिक्षक पात्रता परिक्षेत (टीईटी ) गैरप्रकार करून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यता रद्द करणे संदर्भातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या सादर तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला.मूळ प्रश्नाशी संबंधित दोन उपप्रश्न प्रश्न स्विकारणा-या कार्यालयाद्वारे वगळण्यात आल्यामुळे सदर प्रश्न राखून ठेवण्यात आला.सदर प्रकरणाची चौकशी करू व याच अधिवेशनात सभागृहाला अवगत करु असेही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.
शिक्षक पात्रता परिक्षेतील ( टीईटी ) गैरव्यवहार संबंधी मूळ प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केल्यावर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी काही वेळ उत्तरही दिले. मात्र मूळ प्रश्नाशी संबंधित सात पैकी दोन उपप्रश्न अधिका-यांनी वगळले आहेत हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आणले. जे उमेदवार गुणवत्तेत आले आहेत ते बेकार आणि ज्यांनी कॉपी केली ते नोकरीत हे चालणार नाही असे पवार यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीईटी घोटाळ्या संबंधी तारांकित प्रश्न दाखल केला होती. दाखल केलेला प्रश्न सात भागांचा होता. मात्र प्रश्नोत्तराच्या यादीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित दोन भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले. या टीईटी घोटाळ्यामुळे गुणवत्तेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा यासाठी त्याने एकुण १८ शर्ती पूर्ण केल्या पाहिजे असे असताना प्रश्न सुचनेतील वगळलेला प्रश्न भाग १८ शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करीत नाहीत, हे मला कळले पाहिजे अशी मागणी पवार यांनी केली.तारांकीत प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे. संबधित शिक्षकांवर ६० दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा,असे आदेश असतानाही केवळ काही मंत्री आणि काही आमदार व काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते पवार यांनी केला.
हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने यावर काही निर्णय घेता येवू शकत नसल्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले.त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले. श्रद्धा वालकर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यावर चर्चा झाल्याचे छगन भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले.तर सीमा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात असताना त्यावर चर्चा झाल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगतले.अध्यक्षांनी नियमानुसार हा प्रश्र उपस्थित करता येत नसल्याचे सांगताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी ते दोन उपप्रश्न हाच मूळ प्रश्नाचा गाभा आहे हे निदर्शनास आणिती प्रश्न राखून ठेवला पाहिजे असा आग्रह धरला. लाखो उमेदवारांवर अन्याय झाला आहे असे सांगून विरोधीपक्षनेते पवार यांनीही सदर प्रश्न राखून ठेवा अशी मागणी केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूर्ण माहिती सभागृहासमोर यावी यासाठी प्रश्न राखून ठेवण्यात यावा अशी भूमिका घेतली.त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सदर प्रश्न राखून ठेवला.