मोदी यांची थापांची पतंगबाजी

मुंबई नगरी टीम

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा व्यंगचित्रातून लक्ष्य केले आहे.सक्रांतीनिमित्त मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा पतंग उडवताना दाखवले असून मोदी यांची थापांची पतंगबाजी असे लिहिले आहे.

१० टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि अगोदर दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीवर पडले आहेत, असे दाखवले आहे. मोदी सरकारने गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केला. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे.मात्र ते न्यायालयात टिकेल का, याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. याचा अर्थ सवर्ण आरक्षण म्हणजे केवळ निवडणुकीची जुमलेबाजी आहे, असा टोला यातून राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे.त्याचबरोबर अगोदर दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडलेले दाखवले आहेत.प्रत्येक पतंगावर मोदी यांनी दिलेली आश्वासने,योजना आणि निर्णयांचा उल्लेख आहे.मेक इन इंडिया,नोटबंदी,वर्षाला दोन कोटी रोजगार,स्वच्छ भारत अभियान आदी योजनांचे पतंग पडलेले दाखवले आहेत.मोदींनी फक्त आश्वासने दिली पण एकही आश्वासन पाळले नाही, असे राज ठाकरे यांनी सुचवले आहे. केवळ थापांची पतंगबाजी केली, असा चिमटा राज यांनी काढला आहे. हल्ली भाजपने राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांना तसेच व्यंगचित्रांनी उत्तर देण्याचे ठरवले आहे.यामुळे भाजप आता राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर देतो का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Previous articleओबीसी समाजासाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंजुरी
Next articleमुख्यमंत्र्यांचा ग्रामीण विकासाला विरोध : पृथ्वीराज चव्हाण