आदिवासी शेतकरी-शेतमजुरांचे ३६१ कोटींचे खावटी कर्ज माफ

मुंबई नगरी टीम

मुंबई : आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले २४४.६० कोटींचे कर्ज आणि त्यावरील ११६.५७ कोटींचे व्याज अशा एकूण ३६१ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर हे अत्यंत दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे जुने कर्ज माफ झाल्याने आता त्यांना नवीन कर्जाचा लाभ घेता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत खावटी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आदिवासी शेतकरी आणि शेतमजुरांचे खावटी कर्ज माफ करण्याबाबत चर्चा झाली. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अल्पभूधारक व शेतमजूर यांना पावसाळ्यात रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक अडचणीमुळे त्यांची उपासमार होऊ नये यासाठी खावटी कर्ज देण्यात येते. आदिवासी विकास महामंडळाने २००९ ते २०१४ या कालावधीत २४४ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. या कर्जासह त्यावरील ११६ कोटी ५७ लाख रुपयांचे व्याज थकित आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ९४० कोटी इतकी तरतूद उपलब्ध आहे. या तरतुदीतून ३६१ कोटी १७ लाख इतकी रक्कम खावटी कर्ज माफीचा खर्च भागविण्यास आदिवासी विकास महामंडळास कर्जाची परतफेड म्हणून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

Previous articleशेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय
Next articleपंकजा मुंडेंची बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला ‘सरप्राईज व्हिजीट’