मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने विशेषतः मोठा प्रवास करणा-या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितिचा विचार करून भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.
दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावी अशी रचना करण्यात आली आहे.
पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.
यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. वर्तमानपत्रांनीही महिला स्वछतागृहांची तीव्र निकड असल्याचे निदर्शनास आणून दिली होती. त्याचाही आधार या स्वछतागृह निर्मितीमागे आहे.