कॉंग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडीला ८ जागा सोडणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची लोकसभा  जागावाटप बोलणी अंतिम टप्प्यात असून दोन्ही कॉंग्रेसनी प्रत्येकी वीस जागा लढवण्याचे ठरवले आहे.भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आघाडीत प्रवेश होत असून त्यांच्या वंचित बहुजन आघाडीस ८ जागा सोडण्यात येणार आहेत.दोन्ही कॉंग्रेस आंबेडकरांना प्रत्येकी चार जागा सोडणार असल्याची चर्चा आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी महाआघाडीत राहून लढल्यास त्यांच्या सहा जागा निवडून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.आंबेडकरांनी कॉंग्रेसकडे १२ जागांची मागणी केली होती.पण त्यांना ८ जागा सोडण्यापर्यंत कॉंग्रेस खाली उतरली आहे.यापूर्वी तर कॉंग्रेसने अवघी एक म्हणजे अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती.

गेल्या वेळेस कॉंग्रेसने २७ तर राष्ट्रवादीने २१ जागांवर निवडणूक लढवली.हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीकडे होती.पण त्यांना उमेदवार न मिळाल्याने ती जागा कॉंग्रेसने लढवली. महाराष्ट्रात दलित आणि बहुजन मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याची मोट बांधून भाजप शिवसेनेला शह देण्याचे प्रकाश आंबेडकरांचे धोरण आहे. भाजपवर तीव्र नाराज असलेल्या धनगरांनाही सामील करून घेण्याचा त्यांचा इरादा आहे.

काल आंबेडकरांनी कॉंग्रेसला आम्ही सर्व ४८ जागा लढवू,असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर कॉंग्रेसने आता आठ जागा सोडण्याची तयारी केली आहे.समविचारी मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो,हे कॉंग्रेस आणि आंबेडकर या दोघांनाही चांगले माहीत आहे.

Previous article२७ फेब्रुवारी रोजी सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प
Next articleदुष्काळग्रस्त निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार