मुंबई नगरी टीम
मुंबई: भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनीमामा आणि मंथरेची उपमा दिल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच भडकली आहे.पक्षाने मुंबईत जागोजागी प्रवीणने प्रमोद को क्यूं मारा,अशी पोस्टर्स लावली आहेत.प्रवीण महाजन या प्रमोद महाजन यांच्याच धाकट्या भावाने प्रमोद महाजनांची हत्या केल्याचा संदर्भ यामागे आहे.भाजपकडूनही आता तितकेच तिखट उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने लावलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की,अहो चिऊताई,…महाभारत,रामायण यांचे कथानक राहू द्या.देश की जनता यह जानना चाहती है की प्रवीण ने प्रमोद को क्यूं मारा? भाजपचा प्रमुख मतदार उत्तर भारतीय असल्याने पोस्टर हिंदी भाषेत तयार करण्याची काळजी घेण्यात आली आहे.
सायन येथे सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात पूनम महाजन यांनी पवारांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनीमामाशी केली होती.त्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील कलगीतुरा रंगला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पूनम महाजन यांच्यावर टीका केली आहे.पूनमताई,आपले वडील आणि शरद पवार यांचे संबंध किती मैत्रीपूर्ण होते याचा आपल्याला विसर कसा काय पडला?महाभारतातील कुठल्या तरी काल्पनिक पात्राचे नाव पवारांना देणे आपल्याला शोभत नाही.सभ्यतेची पातळी आम्ही एलांडू शकतो पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत.प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना का मारले याचे अंतर्गत कंगोरे माहीत असलेल्यांपैकी मी एक आहे.आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार.मर्यादा ओलांडू नका,असा इशारा त्यांनी पूनम महाजन यांना दिला आहे.