मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.पार्थ पवार यांनीही राजकारणात सक्रीय प्रवेश केला असून आज त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन दिले.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यांना मावळ मतदारसंघातून थेट लोकसभेसाठीच उभे करण्यात येणार असल्याचे बोलले जाते.मावळमध्ये पक्षाच्या बॅनरवर शरद पवार,अजित पवार यांच्या छायाचित्रांसोबत पार्थ पवार यांची छायाचित्रेही झळकत आहेत.सध्या पार्थ पवार यांनी राजकीय भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.
यापूर्वी पार्थ पवार यांनी विधीमंडळ कामकाज पाहण्यासाठी नागपूरला हजेरी लावली होती.शिवाय, राष्ट्रवादीच्या अनेक सभा आणि कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून हजर असतात.पार्थ पवार निवडणूक लढवण्याबाबत असे म्हणाले होते की,दोन वर्षे काम करून मग निवडणूक लढवावी.पण सारे जण आग्रह करत आहेत की,तुम्ही आताच या.दादांचे म्हणणे आहे की,तू उभा राहिला तरच सीट येणार. त्यामुळे पक्ष ठरवेल त्याप्रमाणे होईल.मात्र इथले प्रश्न समजून घ्यायचे असून विकास कसा आणता येईल त्यादृष्टीने काम करायचे आहे.