मुंबई नगरी टीम
सोलापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाल्याने माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये असलेले आणि आता भाजपचे संजय शिंदे यांच्याशी त्यांचा सामना होणार होईल.
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी अनेक खेळी केल्या आहेत.मुळात विजयसिंह मोहिते यांना लोकसभा उमेदवारी मिळाली असती तर संजय शिंदे यांनी माढा लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवण्याची तयारी सुरू केली होती.माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो.यापूर्वी शरद पवार येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.नंतर गेल्या वेळी विजयसिंह मोहिते यांना उमेदवारी मिळाली आणि ते मोदी लाटेत निवडून आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कारवाया केल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या विरोधात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.शिंदे यांनी तिस-या आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. या निमित्ताने माढ्याचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे.