मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अखेर शिवसेना आणि भाजपाची युती झाली असुन, त्याची अधिकृत घोषणा आज सायंकाळी साडे सहाला भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका संयुक्त पत्रकार परिषदेत करणार आहेत.
स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेला लोकसभा निवडणूकीत सोबत न घेतल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी अखेर भाजपने शिवसेनेला टाळी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीची अधिकृत घोषणा आज करणार आहेत. याची माहिती देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद आज सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी वरळी सीफेस येथिल हॅाटेल ब्लू सी येथे आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत.
आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचा घोषणा केली जाणार आहे. दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत महत्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेकडू राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती. याच बैठकीत लोकसभा व विधानसभा निवडणुका युती एकत्रीत लढण्याचा निर्णय घेण्यात आला.लोकसभेसाठी दोन्ही पक्ष २४-२४ जागा लढणार असून विधानसभेच्या १४५ जागा भाजपा लढेल, तर शिवसेनेला १४३ जागा दिल्या जातील हा फॉर्म्युला या बैठकीत ठरला असल्याचे समजते.
















