सुजय विखे यांच्या नावाच्या चर्चेमुळे दिलीप गांधी गट संतप्त
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील कोणत्याही स्थितीत लोकसभा लढवायची या जिद्दीने पेटले होते. राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी नगरची जागा न सोडल्याने अखेर त्यांनी भाजपचा पर्याय स्वीकारला.पण त्यांच्या भाजप प्रवेशाला नगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपचे नगर मतदार संघाचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांच्या प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी केली.
भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आज संसदीय समितीची बैठक झाली.या बैठकीत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे,अशा चर्चा होत्या.मात्र त्यापूर्वीच दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी फडणवीस यांच्याकडे सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.दिलीप गांधी यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री संतप्त झाले असल्याचे कळते.दिलीप गांधी हे नगरचे विद्यमान खासदार असून सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांना पहिली.पाच वर्ष पक्षाचे काम करु द्यावे आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सुजय विखे पाटील नगर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. विखे उद्या दुपारी १२वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.सुजय विखे आणि वडील राधाकृष्ण विखे यांचे नगरमध्ये प्रचंड काम असून जनाधार मोठा आहे. याचा फायदा भाजपला होईल.