दाऊदला आणण्याची संधी पवारांमुळे हुकली :प्रकाश आंबेडकर

दाऊदला आणण्याची संधी पवारांमुळे हुकली :प्रकाश आंबेडकर

मुंबई ‌नगरी टीम

मुंबईःलोकसभा निवडणूक जवळ आल्यावर जुनी प्रकरणे सर्वच नेते उकरून काढत आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य करताना कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे प्रकरण काढून त्यांना अडचणीत आणले आहे. दाऊद भारताकडे सरेंडर करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली,असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे.मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली,असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा,अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.यामुळे पवार चांगलेच संकटात सापडले आहेत.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या,अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो, असा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता,असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.परंतु पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.तसेच या निर्णयात युपीए सरकार सुद्धा सहभागी आहे,असे सांगण्यात आले होते, असेही ते म्हणाले.जर दाऊद समर्पण करायला तयार होता,तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही,याचा खुलासा होणे आवश्यक आहे’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

‘ज्यावेळी हे सर्व उघड झाले त्यावेळी नरेंद्र मोदींचे भाजप सरकार होते. मग त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?,असा सवाल आंबेडकर यांनी केला.हे प्रकरण स्फोटक असून ऐन निवडणुकीत ते आंबेडकर यांनी काढले आहे. यावर खुलासा करताना. पवारांची दमछाक होण्याची शक्यता आहे.

Previous articleमोहिते पितापुत्र भाजपच्या वाटेवर?
Next articleविखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या अफवेने खळबळ !