सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. म्हसळा येथील पक्ष कार्यालयात या धमकीचे पत्र पोस्टाने आले आहे. ही धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आली असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात येत आहे.

पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी या धमकीविरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, मु. पो. वडगांव तांदळी, जि. अहमदनगर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे या धमकी पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रामुळे तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. आमच्या साहेबांच्या नखालाही धक्का लागू देणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.या पत्रातील व्यक्तीस शोधून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने पोलिसांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

 

Previous articleप्रवीण छेडा स्वगृही परतले
Next articleमहाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर