पालघरमध्ये भाजप खासदार लढणार शिवसेना चिन्हावर ?

पालघरमध्ये भाजप खासदार लढणार शिवसेना चिन्हावर ?

मुंबई ‌नगरी टीम
मुंबईःपालघर लोकसभा जागा ही भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांमध्ये वादाचे कारण बनली होती.तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण त्यांनी आता तो सोडून दिल्याचे सांगण्यात येते. मात्र येथे भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील. परंतु ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पालघरची लोकसभेची जागा ही कायमच भाजपची राहिलेली आहे. दिवंगत खासदार चिंतामन वनगा हे भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर गावित यांना कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात आले होते. शिवसेना-भाजप यांनी कमालीच्या द्वेषाने ही निवडणूक लढवली आणि त्यात वनगा यांचा पराभव झाला.२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाल्याने गावितांची गोची झाली होती. श्रीनिवास यांना शिवसेनेचे तिकीट मिळणार,असेही बोलले जात होते.उद्धव ठाकरे यांनी तर वनगा हेच उमेदवार असतील असे तेव्हाच जाहीर केले होते. आता मात्र ठाकरे यांनी गावित यांच्या उमेदवारीला मान्यता दिली.पालघरमध्ये गावितांनीच लढावे,असे युतीमध्ये ठरल्याचे समजते. तसेच, यानंतर वनगा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत,या बदल्यात त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

Previous articleउर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतुन काँग्रेसची उमेदवारी?
Next articleभाजपाच्या या उमेदवारांनी अर्ज दाखल केले