रिंग रूट, सॅटिस, जलवाहतूक, मेट्रोमुळे येत्या ५ वर्षांत डोंबिवलीचा कायापालट
ठाणे : डोंबिवलीचा कायापालट करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतले असून कल्याण रिंग रूट,डोंबिवली मेट्रो, जलवाहतूक, सॅटिस आदी प्रकल्पांमुळे आगामी पाच वर्षांत डोंबिवली शहराचे रुपडे पालटलेले असेल, अशी ग्वाही शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेद्वार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील प्रचारादरम्यान दिली. डोंबिवलीकर नेहमीच युतीच्या पाठीशी उभे राहिले असून डोंबिवलीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील डॉ. शिंदे यांनी दिली.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारफेऱ्यांना तुफान प्रतिसाद मिळत असून सोमवारी डोंबिवली आणि कल्याण (ग्रामीण) मध्ये प्रचारफेरी दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. तरुणाई त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होती, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिक डॉ. शिंदे यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्यांना विजयी भव असा आशीर्वाद देताना दिसत होते. चौकाचौकात त्यांना सुवासिनींकडून ओवाळण्यात येत होते.
डोंबिवलीतील प्रचार फेरीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना डॉ. शिंदे म्हणाले की, रुंद रस्ते आणि वाहतुकीची पर्यायी साधने यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत डोंबिवलीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात यश मिळाले. कल्याण रिंग रूट प्रकल्पामुळे डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर होईल. तसेच, मेट्रो आणि जलवाहतुकीमुळे रेल्वेला सक्षम पर्याय मिळणार आहे. जलवाहतुकीसाठी केंद्र सरकारने ६५० कोटी रुपये मंजूर केले असून राज्य सरकारने साडे चार हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. डोंबिवली स्थानकाच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून स्थानक परिसराचा पुनर्विकास स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्याची ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली.
मिरवणुकीची सुरवात कोपरगाव येथील गावदेवी मातेचे दर्शन घेऊन करण्यात आली. मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महापौर विनिता राणे, भाजपचे लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे,शहरप्रमुख राजेश मोरे, भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण (ग्रामीण) मधील प्रचार फेरीदरम्यानही डॉ. शिंदे यांनी उपस्थित हजारो नागरिकांशी संवाद साधताना मेट्रोसारख्या प्रकल्पाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठीही होणार असल्याचे सांगितले. देसाई, पडलेगाव, शीळ,डायघर आदी गावांत प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष भोईर,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ पाटील,तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उपमहापौर रमाकांत मढवी, भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे आदी मान्यवर आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.