आता नाश‍िकमध्येही धावणार मेट्रो

आता नाश‍िकमध्येही धावणार मेट्रो

मुंबई नगरी टीम

मुंबई : नाश‍िक महानगर प्रदेशामध्ये सार्वजन‍िक जलद पर‍िवहन व्यवस्था प्रणाली विकसित करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबव‍िण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३३ किलोमीटर लांबीची मुख्य मार्गिका व २६ किलोमीटरची पूरक मार्गिका यांचा समावेश असेल. वीज आणि बॅटरी या दोन्ही ऊर्जास्रोतांचा वापर या प्रकल्पात होत असल्याने तो देशात अभिनव ठरणार आहे.

नाश‍िक हे राज्यातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. नाश‍िक महानगर प्रदेशामध्ये असलेली गावेही झपाट्याने वाढत आहेत. नाश‍िक शहर व आसपासच्या प्रदेशाची गरज लक्षात घेता राज्य शासनाने अत्याधुन‍िक सार्वजन‍िक पर‍िवहन प्रणालीच्या स्वरुपात परवडणारी, प्रदूषणमुक्त व हर‍ित, ऊर्जा प्रेरक आण‍ि व‍िश्वसनीय अशी सार्वजन‍िक पर‍िवहन प्रणाली निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. नाश‍िकच्या सर्वसमावेशक वाहतूक व पर‍िवहन आराखड्याआधारे तसेच शहरातील अरुंद, दाटीवाटीच्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन मेट्रो ही सार्वजन‍िक जलद पर‍िवहन व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

नाश‍िक मेट्रो प्रस्तावानुसार, दोन मुख्य मार्गिकांवर वीज आधारित मेट्रो यान चालविण्यात येतील. यामध्ये गंगापूर ते नाश‍िक रोड रेल्वे स्थानक ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक १ असेल. त्याची लांबी २२.५ किमी राहणार असून त्यामध्ये २० स्थानके असतील. तर गंगापूर ते मुंबई नाका ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक २ राहणार असून त्याची लांबी १०.५ किमी असेल व त्यात १० स्थानके असतील.या दोन मुख्य मार्ग‍िकांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा ११.५ किमी आण‍ि नाश‍िक स्थानक-नांदुरनाका मार्गे श‍िवाजीनगर असा १४.५ किमी असा एकूण २६ किमीचा पूरक मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. या पूरक रस्त्यांवर बॅटरीवर धावणारे मेट्रो यान चालविण्यात येतील. पूरक मार्गांमुळे मुख्‍य मेट्रो मार्गांवर पोहोचणे नागर‍िकांना सुलभ होईल. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाज‍ित खर्च सुमारे २१०० कोटी इतका आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड (महा-मेट्रो) या विशेष उद्देश वहन कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पात राज्य शासन, केंद्र शासन, नाशिक महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी यांचा आर्थिक सहभाग राहणार आहे.

Previous articleज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
Next articleखुशखबर : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक वर्षाच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करा