पराभवाच्या भीतीनेच विरोधकांकडून जातीचे राजकारण
मुंबई नगरी टीम
डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात मी केलेल्या कामांमुळे विरोधकांना त्यांचा पराजय स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच त्यांच्याकडून आगरी समाजाच्या भावना भडकवण्याचे उद्योग सुरू असून जातीचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आगरी बांधव आणि मतदारसंघातील मतदार सुज्ञ असून ते हा डाव हाणून पाडतील, असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे केले.
डोंबिवली येथील मध्यवर्ती शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. शिंदे म्हणाले की, शिवसेना नेहमीच आगरी समाजाच्या सुखदुःखात सहभागी झालेली आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीने नेहमीच पुढाकार घेतला आहे आणि आगरी समाजानेही नेहमी शिवसेना-भाजपवर प्रेम केले आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे ते वारंवार जातीचे राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही कधीच जातीपातीकडे बघून विकासकामे करत नाही. त्यामुळे, आगरी समाजसह संपूर्ण समाज आमच्यासोबत राहील, असा दृढ विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.या प्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.