शरद पवार  घेणार राज्यातील दुष्काळाचा आढावा

शरद पवार  घेणार राज्यातील दुष्काळाचा आढावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या शनिवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. येथिल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये  दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने दुष्काळाचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातल्या भीषण दुष्काळाच्या पाश्वभुमीवर  दुष्काळ व शेतक-यांशी संबंधित मुद्यांकडे पक्षाच्या नेत्यांनी विशेष लक्ष द्यावे अशा सूचना या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. उद्या शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये  होणा-या या बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.राज्यातील दुष्काळाचा आढावा या बैठकीत घेतला जाणून त्यावरील उपाय योजनांवर चर्चा केली जावू शकते. हा आढावा घेतल्यानंतर विधानसभेच्या तयारीचा भाग म्हणून पुढील सहा महिन्यात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे यावरही विचारविनिमय होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व लोकसभेचे उमेदवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जून महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेवून या बैठकीत त्याची रणनितीही आताच आखली जाऊ शकते. लोकसभेचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्यानंतर राज्यातील व देशातील स्थितीनुसार पक्षाची भूमिका काय असावी याबाबत रणनिती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा  आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचे समजते. त्या त्या भागातील स्थानिक नेत्याकडून तसा आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीने यावेळी २० जागांवर आपले उमेदवार उभे केले तर दोन ठिकाणी मित्रपक्षांना पाठिंबा दिला होता.

Previous articleमनसेला खर्चाचा तपशिल मागणे केवळ औपचारिकता ?
Next articleउत्तर प्रदेशातील ११ टक्के दलित मतदार भाजप एनडीएला साथ देणार