उत्तर प्रदेशातील ११ टक्के दलित मतदार भाजप एनडीएला साथ देणार

उत्तर प्रदेशातील ११ टक्के दलित मतदार भाजप एनडीए ला साथ देणार

मुंबई नगरी टीम 

मुंबई :  उत्तर प्रदेशातील २४ टक्के दलित मतदारांपैकी सरासरी १२ टक्के लोक मतदान करतात. त्यातील ११ टक्के मतदान भाजप आणि एनडीएला मिळणार असून, भाजपच्या पुन्हा यूपी मध्ये ७३ जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे संसदेत कौतुक करणाऱ्या समाजवादी नेते मुलायम सिंह यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

लखनौ येथे भाजप चे उमेदवार केंद्रियगृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले लखनौ दौऱ्यावर होते त्यावेळी  तेथील अलिगंज मध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या जाहीर प्रचार सभेत भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी २ जागांवर रिपाइं चे उमेदवार लोकसभा  निवडणूक लढत आहेत. ७८ जागांवर भाजपला रिपब्लिकन पक्षाचे पाठिंबा देण्यात आला आहे. मच्छलिशहर ब्रिजेश कुमार ;गाजियाबाद मध्ये मोहनलाल हे रिटायर्ड डीसीपी असे रिपब्लिकन पक्षाचे दोन उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत अशी माहिती  आठवलेंनी यावेळी दिली.

उत्तर प्रदेशात आज जरी रिपाइं छोटा पक्ष असला तरी पुढील १० वर्षांत रिपाइं हाच यूपी मध्ये मोठा पक्ष असेल. त्यासाठी पुढील काळात आपण अधिक वेळ यूपी मध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करणार आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा खरा पक्ष रिपब्लिकन पक्ष असल्याने बसपा मधील आंबेडकरी अनुयायांनी डॉ बाबसाहेबांच्या संकल्पनेतील रिपाइं मध्ये प्रवेश करावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. बहण मायावती यांनी  यूपीच्या  मुख्यमंत्री होण्यासाठी दोन वेळा भाजप चा पाठिंबा घेतला होता. तेंव्हा भाजपा त्यांना मनुवादी वाटली नाही का ? सवाल करून भाजप हा जातीवादी नाही तर सर्व जातीधर्मांचा पक्ष झाला  आहे. असे आठवले म्हणाले.

मुलायम सिंह यांनी संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन पुन्हा मोदीच प्रधानमंत्री झाले पाहिजे असे वक्तव्य केले होते त्याची आठवण काढून  आठवले यांनी मुलायम यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन केले. दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये जॉर्ज फर्नांडिस सारखे समाजवादी नेते एनडीए मध्ये आले होते त्यामुळे सपा नेते मुलायम सिंह यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन  आठवले यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  ५ वर्षांतील कामाचा आढावा पाहून  उत्तर प्रदेशातील दलित भाजप एनडीए सोबत राहतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. राजनाथ सिंह हे चांगले राष्ट्रीय नेते असून त्यांना पुन्हा बहुमताने निवडून देण्याचे; भाजप एनडीएला साथ देण्याचे आवाहन  आठवले यांनी केले.

Previous articleशरद पवार  घेणार राज्यातील दुष्काळाचा आढावा
Next articleदुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल