धनंजय मुंडे यांनी केला टंचाईग्रस्त शहापूर तालुक्याचा दौरा

धनंजय मुंडे यांनी केला टंचाईग्रस्त शहापूर तालुक्याचा दौरा

मुंबई नगरी टीम

मुंबई : सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकीकडे उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या चिंतेत असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मात्र दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आधार देण्याचे काम सुरूच ठेवले असून आज त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणे ही शहापूर तालुक्यात आहेत. मात्र या धरणातून शहापूर तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत त्यामुळे या भागातील जनतेला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असून जनतेत मोठ्या प्रमाणावर उद्रेक निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज या भागाचा दौरा करतांना.  एका दिवसाते तब्बल १३ गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग वरोरा हे ही होते.

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे शहापूर भागातही दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. जो तालुका मुंबईला पाणी देतो, तोच तालुका आज पाण्यापासून वंचित आहे. याला सर्वस्वी शासन आणि प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षपणाच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.शहापूर तालुक्याच्या २८५  गावांसाठीची भावली धरण पाणी पुरवठा योजना मंजुरी अभावी प्रलंबित आहे.  आमदार  पांडुरंग बरोरा या भागाचे नेतृत्व करतात म्हणूनच युती सरकार जाणीपूर्वक ही योजना पूर्ण करत नाही असा हल्लाबोल मुंडे यांनी सरकारवर केला. आज या भागातील जनतेला  टँकर मिळत नाही,  बोअरवेलला पाणी आहे तिथे मोटार दिली जात नाही  शासन झोपलंय का? असा सवाल उपस्थित करून योजनेला मंजुरी मिळावी यासाठी मी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा एल्गार त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

या दौ-यात सोबत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या, त्याची दखल घेत मुंडे यांनीही त्यांना धारेवर धरत पाणी टंचाईच्या काळात संवेदनशीलतेने काम करावे अशी सूचना केली. दौ-यात जाणवलेल्या बाबीबाबत त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधून पाणी प्रश्न सोडवण्याबाबत सूचित केले.या दौ-यात त्यांनी पेठेचा पाडा, आंब्याचा पाडा, ठेंगनमाळ,  तेलमपाडा, पाटोळपाडा,  ढाकणे,  धुपारवाडी, रोड वडाळ, जाम्भूळ पाडा, बाबरेवाडी, पोकळवाडी, जळकेवाडी, कोठारे या १३ गावांना भेटी दिल्या.या दौ-या दरम्यान त्यांनी आज दुपारी एका शेतातील झाडाखालीच कार्यकर्त्यांसोबत पिठलं भाकरीचे जेवण घेतले.

Previous articleतर त्यांना सेना, भाजपात कधीच प्रवेश मिळालाच नसता
Next articleशिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ?