शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ?

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात असतानाच आता मंत्रिमंडळात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून केली असल्याचे समजते.उपमुख्यमंत्रीपदासाठी सार्वजनिक बांधकामंत्री ( सार्वजनिक उपक्रम ) एकनाथ शिंदे किंवा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचा विचार होवू शकतो.

लोकसभा निवडणुकांचा निकाल उद्या लागणार असून, कल चाचणीच्या पाहणीत पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. कल चाचणीनुसार निकाल लागल्यास राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार   पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपात झालेल्या चर्चेनुसार विधानसभेसाठी निम्या निम्या जागा दोन्ही पक्ष लढवणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे.काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत तसेच मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला चांगली खाती मिळावीत या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

Previous articleधनंजय मुंडे यांनी केला टंचाईग्रस्त शहापूर तालुक्याचा दौरा
Next articleराज्यात युतीचाच बोलबाला ;  पहा कोण आहे आघाडीवर तर कोण पिछाडीवर