राज्यातील सात जणांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी
मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात जणांची वर्णी लागली आहे.यामध्ये नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, पियुष गोयल यांना मंत्रीपदाची तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे, डॅा. संजय धोत्रे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ जणांची वर्णी लागली आहे.यामध्ये यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर ( राज्यसभा ), पियुष गोयल ( राज्यसभा ) तर दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना कॅबिनेटमंत्रीपदाची तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ( जालना ), आरपीआयचे अध्यक्ष आणि यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रामदास आठवले ( राज्यसभा ), अकोल्याचे भाजपचे खासदार डॅा. संजय धोत्रे यांना राज्यमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि अकोल्याचे भाजपचे खासदार डॅा. संजय धोत्रे यांचा पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजपच्या ५, शिवसेना आणि आरपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराला मंत्रीपदी संधी मिळाली आहे. दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मराठी ऐवजी हिंदीतून शपथ घेतली. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, डॅा. संजय धोत्रे यांच्यासह रामदास आठवले यांनी हिंदीतून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार,आमदार, उद्योग क्षेत्रासह, विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.