राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही
मुंबई नगरी टीम
मंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही पक्षात विलीन होणार नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वृत्ताला पूर्णविराम मिळाला आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हि शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादीचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार असल्याने कार्यकर्त्यांनी अफवांना बळू पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत घेतलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा होती. मात्र ही शक्यता राष्ट्रवादीने फेटाळून लावली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, मधुकरराव पिचड, छगन भुजबळ, खा. सुनिल तटकरे, अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,ज्येष्ठ नेते गणेश नाईक, खासदार माजीद मेमन,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, खासदार वंदना चव्हाण,खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार उदयनराजे भोसले, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख,राजेश टोपे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आदींसह पक्षाचे आमदार,जिल्हाध्यक्ष, लोकसभा लढवलेले उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी आणि मनसे घटकाचा प्रभाव नेमका किती पडला याबाबतही पवार यांनी नेत्यांसोबत चर्चा केली. विधानसभा निवडणूक तयारीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला गेला. १०० दिवसांवर विधानसभा निवडणूक असल्याने लवकरात लवकर जागावाटप करून काम सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. लोकसभा निवडणूकीतील निकाल विसरून पुढे अधिक जोमाने काम करण्यासाठी पक्षाची बांधणी करण्यासाठी नेत्यांना विभागांची जबाबदारी दिली जाईल असेही पाटील म्हणाले.आगामी विधानसभा निवडणूकीत तरूणांना, महिलांना व नव्या चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगून, लोकसभा निवडणूकीत बहुजन वंचित आघाडीमुळे ८ ते १० जागांचा तोटा झाला असल्याचे पाटील म्हणाले.