विधानसभेच्या कामाला लागा : शरद पवार

विधानसभेच्या कामाला लागा : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी विधानसभेला सामोरे जायचे आहे. लोकसभेचा काय निकाल लागला हे डोक्यातून काढा. विधानसभेला शंभर दिवस आहेत. आपला पक्ष आपला उमेदवार जनमानसात कसा पोचेल रुजेल याची खबरदारी घ्यायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना केले. या निवडणुकीत धार्मिक उन्माद किती करतील माहित नाही. हा धार्मिक उन्माद आवरायचा असेल तर सेक्युलर लोकांनी एकत्र आले पाहिजे असेही शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मोदी सरकारने कशापध्दतीने यंत्रणा वापरली किंवा कशापध्दतीने आता आपल्याला काम करायला हवे याबाबत माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत कसा प्रचार आणि काम करायचे याचे मार्गदर्शन केले. समाजात उन्माद कसा वाढेल असा प्रयत्न पंतप्रधानांनी प्रचारात वापरला. प्रचाराची दिशा त्यांनी बदलण्याचे काम केले. देशात बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न होता. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेती व शेतीव्यवसायातील अपयश असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र होते. ते मतदानातून व्यक्त होईल अशी अपेक्षा होती. परंतु मोदी यांनी सर्वांचा आढावा घेवून प्रचाराचे सुत्र दुसरीकडे वळवले. लोकांच्या भावनेला आवाहन करुन प्रखर राष्ट्रवाद वाढवला असेही पवार यांनी यावेळी सांगितले. देशाचे होत असलेले ऐक्य लक्षात घेता हे सरकार जाईल असं वाटलं होतं. परंतु पंतप्रधान यांनी केलेली आक्रमक भाषणे तरुण पिढीसमोर गेली. त्यामुळे वेगळे चित्र निर्माण झाले.आपण मांडले शेतकरी, शेती, ऐक्य याचे विचार मांडत होतो परंतु त्यांनी वेगळे विचार मांडले त्यामुळे त्यांना यावेळी जास्त जागा मिळाल्या असेही पवार म्हणाले.

निवडणुक यंत्रणेबाबत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला.अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव आजच्या पंतप्रधानापेक्षा जास्त होता तरी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी कुणी मशीनवर शंका घेतली नाही. राजीव गांधी यांचाही पराभव झाला. त्यावेळी कुणी शंका घेतली नाही. परंतु आजच का शंका बळावली आहे. या मशीनबाबत आम्ही कोर्टात गेलो. आता निकाल लागला तो पराभव मान्य केला परंतु म्हातारी मेल्याचे दु:ख नाही परंतु काळ सोकावतो कामा नये असेही पवार म्हणाले. आजही जनमानसात संशयाचं व चिंतेचे असे वेगळे वातावरण आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेत सावध राहायला हवे असे आवाहनही  पवार यांनी केले.तरुण चेह-यांना संधी दिली जाणार आहे. आज ४० लोकं आहेत. ४० जणांचा संच आहे. एकजुटीने काम करुया. आपलं अस्तित्व, आपलं घर आपण आबादीत राखलं आहे असेही  पवार म्हणाले.

Previous articleउच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक
Next articleराष्ट्रवादी कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही