पुढे काय करायचे ते माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठरलंय
मुंबई नगरी टीम
मुंबई : सत्ताधा-यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे काम हे विरोधी पक्षनेत्याचे असते असे सांगून, मी विरोधी पक्षनेता असताना जे सरकार विरोधात जे वातावरण निर्माण झाले त्यानंतर राज्यात भाजपचे राज्य आले. भाजपचे सरकार येण्यात माझाही खारीचा वाटा आहे, अशी खदखद आज माजी मंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.जे झाले ते झाले, आता पुढे काय करायचे आहे ते माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठरलंय, पण जे ठरलंय ते सांगणार नाही, असेही खडसे म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना केलेल्या भाषणात एकनाथ खडसे यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. आपले अर्धं आयुष्य विरोधी पक्षात गेले. विरोधी पक्षनेत्याचे गुण अजूनही बाहेर येत आहेत. त्यामुळे विसरून जातो की आता सत्ताधारी आहे. कधी कधी आमच्या मंत्र्यांविषयीही बोलतो. पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजू नये की मी विखे-पाटलांची परंपरा सुरू ठेवीन. मी पक्षातच राहीन, असे खडसे म्हणाले.विखे-पाटील हे भाग्यवान आहेत. विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देवून ते थेट तिस-या स्थानावर बसले. कॅबिनेट मंत्री झाले.यापूर्वी सुधीर मुनगंटीवार हे निर्णय प्रकियेत दिसायचे, आता गिरीश महाजन दिसू लागले आहेत. सुधीर मुनगंटीवार तर थेट पाचव्या स्थानावर गेले आहेत, विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला? आणि सत्तेत का आले? ते कळले नाही. आई म्हणते ‘बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उत्तराई’, तसे आता वड्डेटीवारांना विखेंना म्हणावे लागेल ‘तुझा होऊ कसा उत्तराई’ अशी टोलेबाजी खडसे यांनी केली.
खडसेंचे भाषण सुरू असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आता तुमच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय ठरले आहे ते तरी उघड करू नका असे सांगितले. यावर गुलाबराव पाटील यांनी काय ठरलंय ते सांगा, अशी विनंती केली. यावर खडसे यांनी तुमचे काय ठरलंय ते सांगा, युतीत मुख्यमंत्री कोणाचा होणार हे सांगून टाका. म्हणजे वादावादी होणार नाही. मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे सांगत नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही. तेव्हा जे काही ठरलंय ते सांगा, असे खडसे म्हणाले.