जलयुक्त गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी मंत्र्यांना धारेवर धरले

जलयुक्त गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी धनंजय मुंडेंनी मंत्र्यांना धारेवर धरले

मुंबई नगरी टीम

मुंबई : सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला असल्याची कबुली आज सरकारच्यावतीने विधान परिषदेत देण्यात आली.  दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चौकशीची मागणी लावून धरत जलसंधारण मंत्र्यांना धारेवर धरले.  मंत्र्यांच्या उत्तराने गोंधळ झाल्याने सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला.

राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न आज विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.  त्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली.  पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबतचा मुळ प्रश्न होता. त्यात या कामात गैरव्यवहार झाल्याचे विभागाने मान्य केले. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असल्याची कबुली संबंधित मंत्र्यांनी दिली.  तसेच अशा प्रकारच्या १३०० कामांच्या विभागीय चौकशा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी करायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

राज्यात जलयुक्तच्या हजारो कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे.  त्यामुळे सरकार या संपुर्ण जलयुक्त अभियानाचे थर्ड पार्टी ऑडीट करणार काय ?  सरकार भ्रष्टाचाराला, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उघड चौकशीची मागणी मुंडे यांनी केली.  यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराला धनंजय मुंडे यांच्यासह आमदार हेमंत टकले,आमदार सतिश चव्हाण, आमदार भाई जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने मंत्र्यांना  आपले विधान मागे घ्यावे लागले.  तसेच सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

Previous articleविधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार
Next articleफसव्या कर्जमाफीचे पाप कोणाचे ? अशोक चव्हाण यांचा सरकारला संतप्त सवाल